अयोध्येत राम मंदिराच्या शिखरावर मोदींनी धर्म ध्वज फडकवला, हात जोडून प्रणाम !! राम मंदिरावरील धर्मध्वज सत्यमेव जयतेचा उद्घोष करेल.....

Foto

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाच्या पूर्णत्वाचं प्रतीक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार, 25 नोव्हेंबर) मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण केलं. याद्वारे सांस्कृतिक उत्सवाचा आणि राष्ट्रीय एकतेचा नवा अध्याय सुरू होत आहे, अशी टिप्पणी देखील केली. जानेवारी 2024 मध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरामधील श्री रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती. मात्र, तेव्हा राम मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं नव्हतं. अपूर्ण राहिलेलं बांधकाम गेल्या दोन वर्षांमध्ये पूर्ण करण्यात आलं आहे. त्यामुळे आज मोदी यांनी औपचारिकरित्या मंदिरावर ध्वजारोहण केलं.

अयोध्येतील राम मंदिरावर आज ऐतिहासिक क्षण अनुभवला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते राम मंदिरावर 20 फूट लांब आणि 10 फूट उंच भगवा धर्म ध्वज फडकावण्यात आला. हा सोहळा केवळ धार्मिक विधी नव्हता, तर तो मंदिराच्या पूर्णत्वाचे, हिंदू समाजाच्या श्रद्धेचे आणि सांस्कृतिक मूल्यांचे प्रतीक मानला जात आहे. या घटनेने संपूर्ण अयोध्या आणि देशभरातील रामभक्त भारावून गेले आहेत.

राम जन्मभूमी मंदिर, जे शतकानुशतके हिंदू समाजाच्या श्रद्धेचे केंद्र राहिले आहे, ते आज पुन्हा एकदा इतिहासाचे साक्षीदार ठरले. अनेक पिढ्यांच्या प्रतीक्षेनंतर आणि स्वप्नांचा परिपाक असलेल्या या मंदिराच्या पूर्णत्वाचा हा एक महत्त्वाचा सोहळा होता. पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक भागवत यांनी विधिपूर्वक ध्वजपूजन करून मंदिराच्या शिखरावर हा भव्य ध्वज फडकावला.

ध्वजारोहणानंतर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आज या ध्वजारोहणानंतर आपला अनेक वर्षांचा यज्ञ पूर्ण झाल्याची भावना उफाळून आली आहे. आज सगळं जय राममय झालं आहे. भगवान श्री रामांचा हा धर्मध्वज, एक साधारण ध्वज नाही. हा भारतीय सभ्यतेच्या पुनर्जागरणाचा ध्वज आहे. या ध्वजातला भगवा रंग, यामधील सूर्यवंशाची ख्याती, ओम शब्द, यावर रेखाटलेला कोविदार वृक्ष या सगळ्यातून राम राज्याची किर्ती प्रतिरुपित होत आहे. हा ध्वज संकल्प व यशाचा आहे. ही संघर्षातून सृजणाची गाथा आहे. ही संतांची साधना आहे. येणारा काळ श्रीरामाच्या आदर्श सिद्धांतांचा उद्घोष करेल. ङ्गसत्यमेव जयतेफचं आवाहन करेल. सत्याचा नेहमी विजय होतो हेच जगाला सांगेल. सत्य हेच धर्माचं स्वरुप आहे असा संदेश हा ध्वज जगाला देईल.

मंदिर बांधलं अन्‌‍‍ आज त्याची शास्त्रीय प्रक्रिया पूर्ण झाली :  ध्वजारोहणानंतर मोहन भागवत यांची प्रतिक्रिया
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत म्हणाले, 500 वर्षे संघर्ष आणि आता 30 वर्षांच्या लढाईनंतर अयोध्येत आपण राम मंदिर बांधलं. आज त्या मंदिराची शास्त्रीय प्रक्रिया पूर्ण झाली. मंदिरावर ध्वजारोहण झालं. हा त्या रामराज्याचा ध्वज आहे. एके काळी हाच ध्वज अयोध्येत फडकत होता. संपूर्ण विश्‍वात सुख व शांती प्रदान करत होता. तो ध्वज आज पुन्हा एकदा खालून वर गेला आणि शिखरावर जाऊन आरोहित झाला. हा क्षण आम्ही याची देही याची डोळा पाहिला.